अमळनेर : महाराष्ट्र शासनाने जनहित आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा, वितरण आणि विक्रीवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही, अमळनेर शहर आणि परिसरात मात्र या कायद्याची पुरती ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे. शहरात सध्या ‘शरदाच्या कृपा दृष्टीने गुटखा विक्रीत गोकुळचा हैदोस’ सुरू असल्याची जोरदार चर्चा असून, उघडपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे अमळनेरची तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
शाळकरी मुले आणि तरुणाई लक्ष्य!
अमळनेर शहरातील विविध नामांकित शाळा, महाविद्यालये आणि नामांकित कोचिंग क्लासेसच्या परिसरातील टपऱ्या व दुकानांवर हा प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अल्पवयीन शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुण या घातक व्यसनाच्या आहारी जात आहेत. शैक्षणिक केंद्रांच्या परिसरातच हा हैदोस सुरू असल्याने पालकांमध्ये अत्यंत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
रात्रीस खेळ चाले: अवैध साठेबाजी आणि वाहतूक
सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, अमळनेर शहरातील काही प्रमुख मोठे व्यावसायिक छुप्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची साठेबाजी करत आहेत. अन्न सुरक्षा कायद्याला हरताळ फासत, रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्या वेळी या गोदामांमधून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत गुटख्याचा पुरवठा केला जातो. हा छुप्या मार्गाचा नेटवर्क अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे.
कायद्याचे सर्रास उल्लंघन; गुन्हेगारीला खतपाणी
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करून अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSSAI) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. या अवैध धंद्यांमुळे शहरात आर्थिक गुन्हेगारी आणि भाईगिरी करणाऱ्या प्रवृत्तींनाही खतपाणी मिळत आहे.
“एक सजग नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी या नात्याने समाजाप्रती असलेल्या कर्तव्यापोटी ही बाब समोर आणत आहे. या अवैध व्यवसायामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.”
आता तरी कारवाई होणार का?
अमळनेर शहर आणि परिसरातील या गंभीर समस्येची दखल घेऊन पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) संयुक्त मोहीम राबवणार का? छुप्या गोदामांवर छापे टाकून मुख्य साठेबाजांच्या (होलसेलर्स) मुसक्या आवळणार का? की या ‘गोकुळच्या हैदोसा’कडे नेहमीप्रमाणे कानाडोळा केला जाणार, असा संतप्त सवाल आता अमळनेरकर विचारत आहेत.
