अमळनेर शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल समोरील नर्मदा वाडी परिसरातील टीपी नंबर 27 वर सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला! हे घडलेले मोठे अपघात असून, यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा भांडाफोड झाला आहे. असुरक्षित आणि निकृष्ट कामामुळे परिसरातील नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून, ठेकेदाराच्या बेफिकीर वृत्तीमुळे कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकतो.
सुरक्षा उपाय शून्य, जीव धोक्यात!
या कामावर कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाय नाहीत. कामगार आणि परिसरातील नागरिकांना धोका असूनही प्रशासन झोपले आहे. कोणतीही सुरक्षा जाळी नसल्याने हलक्या दर्जाच्या बांधकामामुळे स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे.
पत्रकारांवर ठेकेदाराची दादागिरी – ‘बातमी लावली तर अडकवू’
या गंभीर प्रकारावर पत्रकारांनी ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी घटनास्थळी भेट दिली असता, ठेकेदाराने उर्मट आणि आक्रमक भाषा वापरली. पत्रकारांनी बातमीसाठी प्रतिक्रिया विचारली असता, ठेकेदाराने “तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बाइट का घेताय? बातमी लावली तर पाहून घेऊ” असे धमकीवजा शब्द उच्चारले. एवढेच नाही तर, “जर तुम्ही ही बातमी कुठे प्रसिद्ध केली किंवा तक्रार केली, तर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला अडकवू” अशी सरळसरळ धमकी दिली!
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करा!
पत्रकारांवर दिलेल्या या धमक्या हा पत्रकार संरक्षण कायद्याचा सरळसरळ भंग असून, संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटना आणि नागरिक आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.
नगरपालिकेचे प्रशासन झोपेत ?
या गंभीर प्रकारानंतर नगरपालिका आणि बांधकाम विभाग अजूनही मूग गिळून गप्प बसले आहेत. कोसळणाऱ्या स्लॅबसारख्या अपघातानंतर देखील बांधकाम बंद करण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन केवळ हातावर हात ठेवून तमाशा पाहत आहे.
तातडीने चौकशी करून ठेकेदारावर कठोर कारवाई करा!
नगरपालिकेने तातडीने पुढाकार घेत या धोकादायक आणि बेकायदेशीर कामावर कारवाई करून ठेकेदारावर कठोर दंडात्मक उपाययोजना करावी. तसेच, पत्रकारांना दिलेल्या धमक्यांचा गंभीर दखल घेऊन ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.
जर प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केले, तर शहरभर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.
