अमळनेरमध्ये तासाभराच्या पावसाने उडवली दाणादाण; गटारी तुंबल्याने रस्त्यांना आले नदीचे स्वरूप!….. ​उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्याकडून भर पावसात कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा;

अमळनेर : शहरात झालेल्या अवघ्या एक तासाच्या रिमझिम (रीप-रीप) पावसाने नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल केली आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि कॉलनी परिसरातील गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळेच नाल्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याच्या तीव्र तक्रारी स्थानिक नागरिकांमधून केल्या जात आहेत.

​भर पावसात उपनगराध्यक्ष रस्त्यावर

​शहरातील कॉलनी परिसरात पावसाचे पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी सत्ताधारी नगरसेवकांसह स्वतः भर पावसात प्रत्यक्ष जागेवर धाव घेतली. त्यांनी आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जिथे जिथे पाणी साचले होते, त्या प्रभागांना भेटी दिल्या. कर्मचाऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करत तुंबलेल्या गटारी आणि नाल्या मोकळ्या करून पाण्याचा निचरा करून घेतला. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

​नागरिकांचे अतिक्रमण कारणीभूत: आरोग्य विभाग

​दरम्यान, या पाणी साचण्याच्या समस्येवर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आपली बाजू मांडली आहे. कॉलनी परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोरील नाल्यांवर अनधिकृत बांधकामे केली आहेत, तर काहींनी नाल्या बुजवून अतिक्रमण केले आहे. यामुळेच पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असून पाणी रस्त्यावर येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

​एकीकडे पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, दुसरीकडे नागरिकांच्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेली ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!