चक्क….रात्री कुत्रे तोडतात मुडद्यांची लचके ! 

    अमळनेर : मृत्यूनंतर तरी माणसाला सन्मान मिळेल ही अपेक्षा असते, मात्र अमळनेर नगरपालिकेच्या संवेदनशून्य कारभारामुळे अमरधाम स्मशानभूमीत मृतांच्या सुळसुळीत विटंबनेचा अत्यंत धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडून अपुरे सरण दिले जात असल्याने मृतदेह अर्धवट जळत आहेत आणि रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांकडून या अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना केली जात असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे. या प्रकारामुळे अमळनेर शहरातील सुजान नागरिकांमधून प्रचंड संताप आणि तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अमरधाममधील या भोंगळ कारभारावर प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका शोभा गढरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे.

ना गोवऱ्या, ना पुरेसे लाकूड; अंत्यविधी बनली ‘औपचारिकता’!

अमरधामात अंत्यविधीसाठी अत्यंत कमी प्रमाणात गोवऱ्या आणि सरण उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृतदेह पूर्णपणे जळण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच मिळत नसल्याने अनेक अंत्यसंस्कार अपूर्ण राहत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने दुःखा डोंगराखाली दबलेल्या नातेवाईकांनाच सरण रचण्यापासून ते अंत्यविधीपर्यंतची सर्व कामे स्वतः करावी लागत आहेत, कारण या पवित्र ठिकाणी पालिकेचा एकही कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध नाही.

दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करायला गेल्यावर दिसतात विदारक दृश्ये!

अपुऱ्या सरणामुळे रात्री मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असतात. मध्यरात्री स्मशानभूमीत मोकाट फिरणारी भटकी कुत्री या मृतदेहांचे लचके तोडत असल्याचे संतापजनक प्रकार वारंवार घडत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नातेवाईक अस्थी संकलनासाठी (राख गोळा करण्यासाठी) अमरधामात येतात, तेव्हा त्यांना आपल्या माणसाच्या देहाची झालेली ही दुरवस्था पाहून अश्रू अनावर होतात. या विदारक दृश्यांमुळे नागरिकांच्या भावनांचा तीव्र उद्रेक होत आहे.

“नगराध्यक्षांनी मौन सोडावे; जबाबदारीपासून पळ काढू नये”

“शहरातील सर्वात संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. नगराध्यक्षांनी या प्रश्नावर आतातरी आपले मौन बाळगणे सोडावे. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून अमरधामात ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”— नगरसेविका शोभाबाई गढरे (प्रभाग क्र. ३)

“मृतांचाही सन्मान राखला जात नसेल, तर जिवंतांच्या सुरक्षिततेची काय अपेक्षा?”

“अमरधामसारख्या पवित्र ठिकाणीही अशी अमानुष अवस्था असेल, तर ही केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर पूर्णपणे संवेदनशून्यता आहे. वारंवार असे गंभीर प्रकार घडत असताना पालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी गप्प का आहेत? जिवंतपणी छळणारे प्रशासन आता मृतांचाही अपमान करत आहे का, हा खरा प्रश्न आहे.”— दुर्गेश पाटील, नागरिक (शनीपेठ, अमळनेर)

आता तरी मुख्याधिकारी डोळे उघडणार का?

स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेची ही दुरवस्था पालिकेच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या गंभीर प्रकरणात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अमरधामात पुरेशा प्रमाणात सरण, गोवऱ्या आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अमळनेरकरांकडून अत्यंत आक्रमकपणे केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!