तळवाडे येथे मुरूम टाकण्याच्या वादातून मातंग व भिल्ल समाजातील नागरिकांना मारहाण; तिघांवर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

अमळनेर :तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना २९ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूम टाकण्याच्या वादातून दिली धमकी​मिळालेल्या माहितीनुसार, तळवाडे गावातील शेतशिवारात पाईपलाईनचे काम सुरू होते. त्या ठिकाणी निघालेला मुरूम शिवाजी लोटन पाटील हा ट्रॅक्टरद्वारे दुसरीकडे टाकत होता. त्यावेळी फिर्यादी रेखा अरुण वाघ यांचे पती अरुण वाघ, दिर प्रवीण वाघ, संजय वाघ, लालचंद भिल व यशोदाबाई भिल यांनी, “इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा नवनाथ बल्ल्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाका,” असे सांगितले.

याचा राग आल्याने शिवाजी पाटील याने, “तुम्हा मातंग व भिल्लांना मुरूम टाकून देणार नाही, इथे बल्ल्यावर राहू देणार नाही, ट्रॅक्टरखाली चिरडून टाकू,” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.

महिलांनाही मारहाण

​त्यानंतर आरोपी शिवाजी पाटील याने फोन करून लोटन मोतीराम पाटील व उमेश लोटन पाटील यांना घटनास्थळी बोलवून घेतले. या तिघांनी मिळून शिवीगाळ करत अरुण वाघ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रेखा वाघ यांचा हात शिवाजी पाटील याने ओढल्याने त्यांच्या हातातील बांगड्या फुटून त्या जखमी झाल्या. तसेच यशोदाबाई भिल या महिलेलाही तिघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू
​या प्रकरणी अमळनेर पोलिसांत आरोपी:
१) शिवाजी लोटन पाटील
२) लोटन मोतीराम पाटील
३) उमेश लोटन पाटील

यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!