अमळनेरला ‘ओल्या’ मैफलींचा जागोजागी दर‘बार’ ……. ‘राउशु’ सैराट अन‌् ‘भूमिपुत्र’ झिंगाट

       अमळनेर : शहरासह परिसरात अवैध मद्यविक्रीने अक्षरशः उच्छाद मांडला असून, दारूशिवाय धंदाच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या हॉटेल्स, ढाबे आणि फॅमिली रेस्टॉरंट्सकडे मद्यविक्री अथवा मद्यप्राशनाचा कोणताही अधिकृत परवाना नाही, त्या ठिकाणी सर्रासपणे बियर, विदेशी मद्य आणि देशी दारू उपलब्ध होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

        शहरातील मुख्य रस्ते, धुळे रोड परिसर आणि शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे ‘दरबार’ भरत असल्याचे चित्र आहे. नियम धाब्यावर बसवत काही हॉटेल चालक काउंटरखालून मद्य पुरवत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. परवानाधारक बारप्रमाणे वातावरण तयार करून ग्राहकांना ‘स्पेशल सेवा’ दिली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

       मद्यविक्रीसाठी शासनाकडून विशिष्ट परवाना आवश्यक असताना अनेक ठिकाणी महसूल बुडवून छुप्या मार्गाने हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी महाविद्यालयीन युवक आणि अल्पवयीन मुलांपर्यंत सहजपणे दारू पोहोचत असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

      अवैध मद्यविक्री रोखण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असताना, अधूनमधून होणाऱ्या किरकोळ कारवायांपलीकडे ठोस मोहीम दिसत नसल्याने नेमके कुणाचे अभय या धंद्यांना आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या व्यवहारांकडे विभागाचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

        महिला वर्गातूनही तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वाढत्या छेडछाड, भांडणे आणि रात्रीच्या गोंधळामागे अवैध मद्यविक्रीच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. परवाना नसताना खुलेआम दारू विक्री होत असेल, तर प्रशासन नेमके काय करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

       अवैध मद्यविक्री तातडीने बंद करून संबंधित हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता राज्य उत्पादन शुल्क विभाग या ‘ओल्या दरबारां’वर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे मौन बाळगणार, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!