अमळनेर: “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो” हा वडिलांचा संस्कार जपत, अमळनेर येथील शिंगाणे बंधूंनी आपल्या पित्याच्या निधनानंतर दुःख उगाळत न बसता समाजासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सेवानिवृत्त शिक्षक कै. पंडित बाबुलाल भोई (शिंगाणे) यांच्या गंधमुक्तीच्या दिवशी त्यांच्या तिन्ही मुलांनी भोई समाजासाठी शवपेटी भेट देऊन एक नवा आदर्श घालून दिला.

संस्कारांची शिदोरी आणि सेवाभाव
कै. पंडित भोई हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि प्रेमळ स्वभावासाठी परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मनोज शिंगाणे (रक्तदान चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते), नितीन शिंगाणे आणि डॉ. सुनील शिंगाणे (कोरोना काळातील योद्धा) यांनी वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले. उत्तरकार्याच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजाची निकड ओळखून त्यांनी ही भेट दिली.

