अमळनेर: छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ या भव्य महानाट्याचे दिमाखात सादरीकरण करण्यात आले. संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रयोगाला अमळनेरकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘जयनिल फाऊंडेशन’चे अधिकृत लोगो अनावरण प.पु. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले की, “तरुणाईला केंद्रबिंदू मानून शिक्षण, आरोग्य, शेती आणि क्रीडा क्षेत्रात फाऊंडेशन आगामी काळात कार्य करेल.” याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर,रिता बाविस्कर, जितेंद्र ठाकूर, प्रांतधिकारी मयूर भंगाळे, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, निरज अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

