टाकरखेडा हादरले! ऊसतोड कामगार कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली धाव घेत सामूहिक आत्महत्या…..पती-पत्नीसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच मृत्यू; अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर: तालुक्यातील टाकरखेडा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, ऊसतोड कामगार कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या दोन लहान मुलांनी धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे रानाईचे येथील रहिवासी असलेले मात्र सध्या टाकरखेडा येथे वास्तव्यास असलेले ऊसतोड कामगार सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान आपल्या दोन निष्पाप मुलांसह (सनी आणि राज) धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेच्या धडकेत चौघांचेही शरीर छिन्नविच्छिन्न होऊन त्यांचा घटनास्थळीच करुण अंत झाला. पहाटे ४:४० वाजेच्या सुमारास रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलिसांची धाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची कारवाई सुरू केली.
गावावर शोककळा; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
एकाच घरातील चौघांचा अशा प्रकारे अकाली आणि अत्यंत विदारक अंत झाल्याने टाकरखेडा आणि रानाईचे गावावर शोककळा पसरली आहे. सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.