चोपड्यातील थरारक खून प्रकरणाचा २४ तासात छडा; स्थानिक गुन्हे शाखेची चालत्या रेल्वेत फिल्मी स्टाईल कारवाई

जळगाव : चोपडा शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा चेहरा ठेचून खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईहून पळून येणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेत शिताफीने ताब्यात घेतले.

नेमकी घटना काय?

    १९ एप्रिल २०२६ च्या रात्री ९ ते २० एप्रिलच्या सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी जवळ ही घटना घडली. प्रदिप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) या तरुणाचा संशयित आरोपी विजय भास्कर वेदकर आणि निर्मल संजय बडगुजर यांनी संगनमताने अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून निर्घृण खून केला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचा थरारक पाठलाग

      गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले, मात्र आरोपी दादरहून रेल्वेने जळगावच्या दिशेने परतत असल्याची नवी माहिती समोर आली.

     कोणत्या रेल्वेत आरोपी आहेत हे निश्चित माहीत नसतानाही, पोलीस पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये तपास सुरू केला. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेमध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींना शोधून काढले आणि ताब्यात घेतले.

कठोर चौकशीनंतर दिली कबुली

     सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, पूर्ववैमनस्यातून प्रदिप महाजन यांचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले. चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.

तपासातील सहभागी पथक

      ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वी केली:

      स्थानिक गुन्हे शाखा: पोउनि सोपान गोरे, पोउनि जितेंद्र वल्टे, रविंद्र पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, विष्णु बिऱ्हाडे, सुनील दामोदरे, रावसाहेब पाटील, रिझवान शेख.

चोपडा शहर पोलीस: पो. निरी. पवन देसेले, पोउनि चेतन परदेशी.

चोपडा शहरात खळबळ माजवून देणाऱ्या या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अत्यंत वेगाने पूर्ण केल्यामुळे पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!