मुडी शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक पदाची ‘दुहेरी मान्यता’ वादाच्या भोऱ्यात; चौकशीची मागणी

     अमळनेर : ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी (ता. अमळनेर) संचलित कै. दादासाहेब विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल, शिरूड येथील मुख्याध्यापक पदाच्या मान्यतेवरून मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. एकाच पदासाठी एकाच कालावधीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींना मान्यता देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संस्थेचे तहहयात संचालक रमेश विनायकराव पाटील यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

नेमके प्रकरण काय?

       तक्रारदार रमेश पाटील यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जळगाव आणि शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याकडे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक आर. ए. शिंदे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर रिक्त पदावर श्रीमती सविता बबनराव बोरसे यांना १ मार्च २०२४ ते ३१ मे २०२४ या कालावधीसाठी ‘प्रभारी मुख्याध्यापक’ म्हणून स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आले होते.

      मात्र, त्याचवेळी शिक्षण विभागाने याच कालावधीसाठी श्री. अनिल शिवाजी सूर्यवंशी यांनाही नियमित ‘मुख्याध्यापक’ म्हणून मान्यता प्रदान केली आहे. एकाच प्रस्तावाच्या आधारे (प्रस्ताव क्र. ३२६) दोन परस्परविरोधी आदेश निर्गमित होणे हे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

तक्रारदाराचे गंभीर आरोप:

फसवणूक: संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी बनावट दस्तऐवज आणि खोटा अजेंडा तयार करून प्रशासनाची दिशाभूल केली.

नियमबाह्य कार्यवाही: एकाच कालावधीत दुहेरी मान्यता देणे हे महाराष्ट्र शिक्षण सेवा नियमांचे उघड उल्लंघन आहे.

दप्तर ताबा: संस्थेचे मूळ दप्तर कायदेशीररीत्या आपल्याकडे असतानाही विरोधकांनी बनावट दप्तर तयार करून व्यवहार केल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला आहे.

प्रमुख मागण्या:

१. मुख्याध्यापक पदाची दुहेरी मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी.

२. बनावट प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्था अध्यक्ष व सचिवांची सखोल चौकशी व्हावी.

३. या प्रकरणाची तातडीने सुनावणी लावून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

      या संदर्भात शिक्षण विभागाने दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही रमेश पाटील यांनी दिला आहे. आता या गंभीर तक्रारीवर शिक्षण विभाग काय भूमिका घेते, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!