अमळनेर शहर प्रतिनिधी, तालुक्यातील उदयनगर गावाचे भावी नेतृत्व आणि तडफदार तरुण व्यक्तिमत्व चेतनदादा वाघ यांचा क्षत्रिय किराड समाजाच्या वतीने पुणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून, अमळनेर आणि उदयनगर ग्रामस्थांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या सत्कार समारंभाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:
विशाल किराळ (महामंत्री, अखिल भारतीय किराळ समाज)रतनजी घनश्याम किराळ (अध्यक्ष, पुणे टिंबर असोसिएशन व सचिव, किराड समाज पुणे)गणेश बिडकर (सभागृह नेते, पुणे महानगरपालिका)विशालदादा धनवडे (नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, पुणे महानगरपालिका)यांच्यासह पुण्यातील नागरिक आणि समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेतनदादा वाघ सत्काराला उत्तर देताना चेतनदादा वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, “आज झालेला हा सत्कार माझा वैयक्तिक नसून, माझ्या गावकऱ्यांच्या प्रेमाचा आणि कुटुंबाच्या संस्कारांचा विजय आहे. महाराजांच्या विचारांप्रमाणे शिस्त आणि जबाबदारी अंगीकारली, तर विकास होण्यास वेळ लागणार नाही.”
कार्यक्रमात चेतनदादांनी ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि महिलांसाठी महत्त्वाचे संकल्प जाहीर केले: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन उपक्रम राबविणार, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष योजना हाती घेणार, स्मार्ट गाव किंवा शहर म्हणजे केवळ इमारती नसून, सजग नागरिक होय. कचरा व्यवस्थापन, पाणी आणि वीज बचतीतूनच आपण पर्यावरण संवर्धन करू शकतो.
”नेतृत्व म्हणजे केवळ पद नसून ती एक मोठी जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून समाजाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. शेवटी, क्षत्रिय किराड समाज आणि उपस्थित मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. हा सत्कार सोहळा भविष्यात अधिक निष्ठेने कार्य करण्यासाठी ऊर्जा देणारा ठरला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली
