अमळनेरचे युवा लेखक मयूर बागुल यांना शासनाचा राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर……

       महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग यांच्यातर्फे सन २०२४ चे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, अमळनेर मधील जेष्ठ पत्रकार तसेच उदयकाळ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल ह्यांचा चिरंजीव युवा लेखक मयूर बागुल यांना प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या ” सर्जक ” या पुस्तकासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय विषयक उत्कृष्ट लेखनाबद्दल एक लाख रुपयांचा ‘वसंतराव नाईक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

    अमळनेर येथील युवा लेखक मयूर बागुल यांनी ग्रामीण जीवन, शेतीतील नवकल्पना आणि शेतकऱ्यांच्या संघर्षमय वास्तवाचे प्रभावी चित्रण सर्जक या पुस्तकातून केले आहे. कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसायांच्या नव्या संधींवर त्यांनी अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मांडणी केली आहे.

    ” सर्जक “हे पुस्तक चपराक प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून, पुस्तक लेखनासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब तसेच सहज जलबोध अभियानाचे प्रणेते, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र दादा धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकाशक श्री. घनश्याम पाटील व चपराक परिवारातील सदस्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.

     या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील साहित्य व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक संस्थांकडून मयूर बागुल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     ग्रामीण प्रश्नांवर ठोस आणि अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील लेखक म्हणून मयूर बागुल यांचे नाव आता राज्यभरात चर्चेत आले असून, त्यांच्या या यशामुळे स्थानिक तरुणांना लेखन व संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!