.तो मोठा, ती छोटी!..✍🏻 डॉ. संजय गोर्डे

विशेष लेख……

तो वाडा- ती झोपडी , तो दरवाजा – ती खिडकी, तो गॅस – ती शेगडी, तो पर्वत – ती टेकडी , तो गाव- ती वाडी, तो हंडा- ती कळशी, तो रांजण – ती घागर , तो सागर – ती नदी , तो दिवा – ती पणती, तो धबधबा – ती जलधार , तो मुकुट- ती टोपी इत्यादी….. म्हणजेच तो मोठा – ती छोटी! मोठं ते सारं पुल्लिंगी अन् छोटं ते सारं स्त्रीलिंगी अशी पुरुषवर्चस्ववादी शब्दकळा!… पण आणखी एक गंमत पुरुषी मर्दानगी सांगणाऱ्या काही गोष्टी नंपुसकलिंगी नि स्त्रीलिंगी आहेतः उदा. ५६ इंची असली तरी ‘ती ‘छाती, भिडणारे असले तरी ‘ते ‘मनगट , कितीही पिळली तरी ‘ती ‘ मिशी, ते धाडस, ते बळ, ती शक्ती , ते पौरुष इत्यादी इत्यादी. आज ८ मार्च तिचा दिवस! स्त्री सुंदर असते का? माहीत नाही; पण मुळात स्त्री असणं हेच सुंदर असतं. ती विश्वाची निर्मिक, जन्मदात्री. जग कितीही फॉरवर्ड झालं तरी अजून पुरुष काही बाळंत होत नाही. पराक्रमाचं मातृत्व पुरुषांकडं असलं तरी मातृत्वाचा पराक्रम मात्र स्त्रीच करू शकते. सगळं नसलं तरी अर्ध जग तिचं आहे. मातृत्व परमपवित्र, पुण्यशीलच असतं. पूत्र कुपूत्र होऊ शकतो, माता कधीच कुमाता नसते. ‘माता नच तू वैरिणी ‘असे अपवाद सोडून द्यायचे.

एक वाचलेली गंमत : एका शहरात एक नवीन दुकान झाले. एक तरूण तिथून चालला होता. दुकानावर पाटी होती – ‘ येथे योग्य पत्नी मिळेल. ‘ आनंदानं आत शिरला , समोरच लिहिले होते : योग्य पत्नी हवी असेल तर वरच्या मजल्यावर जा. अयोग्य हवी असेल तर समोरचा दरवाजा उघडा. तो आशेने वर गेला. पाहतो तर दोन दरवाजांवर दोन पाट्या तरुण हवी असेल तर हा दरवाजा उघडा, ज्येष्ठ हवी असेल तर हा दरवाजा उघडा . तरूणच बरी म्हणून तो दरवाजा उघडून आत जातो. पुन्हा दोन पाट्या , सुंदर की साधारण ? तो सुंदर निवडतो. सुग्रण की स्वयंपाक न येणारी. त्याला सुग्रणच हवी होती. आत जातो तर पुन्हा दोन पर्याय: गाणारी की न गाणारी ? गाणारी निवडतो. पुन्हा प्रश्न हुंडा देणारी की हुंडा घेणारी ? मनात विचार करतो देणारीच बरी. पुन्हा दोन विकल्प भांडणारी हवी की प्रेमळ ? स्वाभाविकपणे प्रेमळ चा दरवाजा उघडतो. शेवटी मात्र एकच दरवाजा लागतो. आत्ता नक्की भेटतेय अशा खात्रीनं तो दार उघडतो तर तिथं एक मोठा आरसा लावलेला असतो, आरशाखाली लिहिलेले असते, ‘ आपण फार गुणांचे चाहते आहात!पहिले आपला चेहरा पाहा आणि फुटा !’ स्वतःच्या अवगुणांवर पुरुषत्वाचे टाकलेले आच्छादन स्वतःच्या हातांनी निर्दयपणे दूर करण्याचा मुहूर्त म्हणजे महिला दिन! ..

आणि एक किस्सा बाबासाहेबांचा : बाबासाहेबांना कोणीतरी विचारलं , ‘ तुम्ही असे जागजागून पुस्तके का वाचता? ‘ तेव्हा बाबासाहेब म्हणाले , ‘ पिढ्या न् पिढया झोपलेल्या माझ्या समाजाला जागे करण्यासाठी कोणीतरी जागलं पाहिजे, म्हणून मी जागतोय.’ बायकांनी स्वतःला असं जागं करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन!

बाई काय असते ? मेघना पेठेंनी दोन ओळींत सांगितलंय ! त्या म्हणतात, ‘ सारखं बाई बाई करायचं कारण नाही , गुणसूत्रांचा अपघात असतो तो!’ आठवतंय ना , आठवीला शिकलेलं विज्ञान! X X क्रोमोझोम्स एकत्र आले की स्त्री गर्भाची आणि XY हे क्रोमोझोम्स एकत्र आले की पुरुष गर्भाची निर्मिती होते. एक निसर्गदत्त जैविक घटना ,पण आपण साऱ्यांनीच केवढा बाऊ करून घेतलाय बरं! नुसतं नाकातला शेंबूड रुमालात घेऊन फिरणारी सुशिक्षित माणसं वाढून काय उपयोग? त्यामुळं आता २१ व्या शतकात तरी माणूस म्हणून एकमेकांकडं स्वच्छ नजरेनं पाहूयात. मग वेगवेगळे दिन साजरे करतांना , वृथा दीनवाणं होऊन का जगायच.

लेखक–डॉ. संजय गोर्डे
(संपर्कः 8668578393)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!