प्रताप’ मध्ये जागतिक महिला दिन निमित्त वृक्षारोपण

अमळनेर  येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभाग द्वारे आज एक विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सक्रिय सहभाग संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.पुष्पा पाटील यांनी केले, तर प्रा. उज्वला मोरे यांनी पालक म्हणून सहकार्य केले.


वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वनस्पतिशास्त्र विभागाचे विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संरक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ.रवींद्र मराठे आणि श्री. संदीप बिऱ्हाडे यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.पुष्पा पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद करताना म्हटले की, “महिला सक्षमीकरणासाठी निसर्गाशी नाते जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वृक्षारोपणाद्वारे आम्ही पर्यावरण संरक्षणासोबतच महिला सक्षमीकरणाचा संदेशही देत आहोत.”
प्रा.उज्वला मोरे यांनी वृक्षारोपणाची सुरुवात करताना अशा उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज अधोरेखित केले आहे. या प्रसंगी वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थिनींनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
या वेळी विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे म्हणाले की, “आमच्या विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करताना, आम्ही महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.”
कार्यक्रमादरम्यान औषधी वनस्पती, फुलझाडे आणि फळझाडांच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या रोपट्यांची निगा राखण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात आजपर्यंत अशा अनेक वृक्षारोपणांमधून एक हरितपट्टा तयार होत असून, पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचविण्याचे कार्य अशा उपक्रमातून होत आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला डॉ.रवींद्र मराठे यांनी सर्व सहभागींचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!