विशेष लेख…..
प्रत्येकाला मस्त, शांत, निवांत आणि आरामदायी जीवन जगायचे आहे. धावपळीचं, धकाधकीचं जीवन कुणालाच नको असतं. प्रत्यक्षात मात्र शांतीच्या शोधात माणूस केवढी वणवण करतोय! शांती राहिली दूर भलतीच भ्रांती पडलीहे! प्रचंड पैसा मिळवायचाहे,… कशासाठी? तर आरामशीर जगण्यासाठी! दोनशे वर्षांचा पास मिळाल्यासारखा भोंगळ आशावाद! पैशाच्या चक्करमध्ये आयुष्य मेटाकुटीला येतं. शांत,समाधानी, निरामय, निश्चिंत जगण्याचं स्वप्न अधुरंच राहून जातं. करोडोंच्या ढिगात माणसं बेचैन! दिलो में संतुष्टी रखो, लोग तो महलों मे भी रो रहे है। पैसा वाईट नसतो… त्याची हाव वाईट असते. बुद्ध म्हटले, आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. अन् ओशो म्हणतात, सिगार बुरी नही होती, उसकी आदत बुरी होती है। पैगंबर म्हणतात, किती सोनं दिल्यावर माणसाचं पोट भरेल?.. एक, दोन, तीन, दहा तोळे!… सोन्याचा डोंगर दिला तरी माणसाचं पोट भरत नाही. माणसाचं पोट भरतं मातीने! कब्र मध्ये टाकून चार घमेले माती लोटली आणि ती तोंडात गेली की मगच त्याचं पोट भरतं. कशी वागतातहे माणसं इस्त्रायल – पॅलेस्टिनच्या युद्धात जवळपास साठ हजार माणसं मारली गेलीत. पवनचक्क्यांचे धोरण ठरवणारे जेलची चक्की पिसताहेत. छोट्या छोट्या चिमुरड्यांवर अत्याचार होताहेत! हत्याराच्या परवान्यासाठी हल्ल्याचा बनाव केला जातोहे. खून खराबे नित्याचेच होत चाललेत . अपघात तर काय सेकंदाला घडताहेत. देव-देवी- संतांच्या मिरवणूकीत मध्यरात्री दीडदोन वाजता फटाक्यांच्या लडी फुटताहेत. भक्तीमार्ग लोकांना जागं करण्यासाठी असतो , की लोकांच्या झोपा मोडण्यासाठी? मंत्रीपद भेटलं तरी पालकमंत्री पदाचा मोह आवरत नाहीहे .थोडी उदाहरणं घेतली करंट अफेअर्समधली … आणखीही खूप सांगता येतील. किती माणसं मारल्यावर ,… किती संपत्ती साठवल्यावर … किती भोग भोगल्यावर… जगात शांती निर्माण होईल? अशांत भोवतालात काही कळंना झालंय ना ? जगात शांती निर्माण करण्याआधी ती मनात निर्माण करावी लागेल. विश्वशांतीचा प्रवास मनःशांती पासून सुरू होतो. उद्विग्न माणसं शांती कशी प्रस्थापित करणार? मूळाकडं गेलो नाही,तर फांद्यांना झोंबकाळे घेऊन काय साध्य होणार? विचारांची शाश्वत बैठक विस्कळीत झालीय ना! धान्य नसलेली कणसं, गर नसलेली फणसं आणि विचारधारा नसलेली माणसं कुचकामी ठरतात. एकाने देवाला प्रश्न विचारला , वजन वाढलंय काय करू ?… देव म्हटला, शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम, मनाचं वाढलं असेल तर ध्यान आणि धनाचं वाढलं असेल तर दान कर. स्वतःला तनमनधनानं असं जड करून घेतल्यावर हलकं हलकं कसं वाटणार!
कष्टाच्या कमाईपेक्षा हरामाच्या कमाईवर विश्वास वाढतो आहे. तंत्रज्ञान माणसाच्या मनावर आघात करतं आहे. पैसा आणि सत्ता यांचे वर्तुळ निर्माण झाले आहे.
कुंभमेळ्यातले बरेच साधूही आखाड्यांच्या चढाओढीत आणि चमत्कारांच्या धुंदीत मग्न आहेत. शेतकरी निर्धन आहे म्हणून आणि आयटी इंजिनीअर मोठं पॅकेज, खूप पैसे आहेत म्हणून आत्महत्या करतांना दिसतात म्हणजे कुठेतरी गडबड आहे. सोशल मीडियानं फोमो आणि जोमो ,Fear of missing out आणि Joy of missing out ची भर टाकलीये. माणसाची नखं वाढतात ही माणूस शिकारी असल्याची खूण आजही शिल्लक आहे.. पण शिकारीच्या नादात माणसानं दुर्दैवानं स्वतःच्याच मनःशांतीची शिकार करून टाकली आहे. जगाला युद्धाची नाही बुद्धाचीच गरज आहे. मनातल्या आणि रणातल्या संहाराला शांतीच्या सृजनानंच उत्तर द्यावं लागेल. मनाचंच मंदिर करावं लागेल. सगळी माणसं सुसाट पळतांना दिसतातहे. प्रत्येकजण बिझी आहे. गंमत म्हणजे तुम्ही फार बिझी आहात पण नेमके कशात बिझी आहात? असं विचारलं तर त्यालाच सांगता येत नाही. अशा लोकांना B.W.W.म्हणतात… म्हणजे Busy Without Work. वृथा उरस्फोड करण्यापेक्षा स्वतःची टाइम थिअरी तयार करावी लागेल. वेळेआधी या . वेळेत काम सुरू करा. वेळ वाया घालवू नका. वेळेआधी काम पूर्ण करा. वेळेवर घरी या. घरच्यांना वेळ द्या. वेळच्यावेळी खा. वेळ काढून वाचन करा. वेळेवर झोपा. वेळेत उठून व्यायाम करा. सर्ववेळ प्रफुल्लित रहा. ही आहे टाइम थिअरी.
शांतीच्या शोधात माणूस कुठं कुठं फिरतोय! देवालयं, मदिरालयं, प्रेक्षणीय ठिकाणं, रम्य स्थळं, सिनेमागृह , तीर्थक्षेत्रं सगळीकडची गर्दी शांतीचाच तर शोध घेते आहे. . . पण मिळते का? हा खरा सवाल!
खरं तर फार दूर जाण्याची गरज नसते, कदाचित ती आपल्या घराच्या अंगणातच लपलेली असेल किंवा आपल्याच मनाच्या कोपऱ्यात! जब जागो तब सुबह होगी।
*लेखक :-डॉ. संजय गोर्डे*
*8668578393*
