विशेष लेख….
दिप्तीच्या मैत्रिणीचे लग्न होते. सगळ्या मैत्रिणींनी ठरवले हळदीला वन पीस घालायचा आणि लग्नात पैठणी. त्यांनी रंगाची पण थीम ठेवली. वन पीस रेडिश कलर आणि पैठणी मोरपीसी कलर.
दिप्ती कडे दोन्ही नव्हते. वन पीस तर नव्हताच नव्हता आणि पैठणीचा पण रंग नव्हता. कोणी म्हणाले माझ्याकडे आहे. पण जरा जुनीच झाली. मग सगळ्याच म्हणाल्या, चला दोन्ही नवीनच घेऊ. दुकानदार पण एकदम घेतल्या तर थोड डिस्काउंट देईल. आजच ऑफिस सुटल्यावर जायचे ठरले . दिप्तीने आईला आधीच घरी यायला उशीर होईल. श्रुतीच्या लग्नाची शॉपिंग करायला जाणार हे सागितले . ठरल्या प्रमाणे दुकानात जाऊन मस्त खरेदी केली. घरी यायला जवळ जवळ साडेआठ वाजले. दिप्ती घरी आली. आई आणि वहिनीला साडी आणि ड्रेस दाखवला.नंतर हळदीला वन पीस घालून डान्स करणार असल्याचे सांगितले.
वहिनी गुस्यातच म्हणाली. दिप्ती, “शोभत का तुला हे असं डान्सबिन्स करण..?” “जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे?”
दिप्ती म्हणाली,वहिनी त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? पूर्ण कपडे घालून डान्स करणार आहोत.आणि मी एकटीच नाही. ग्रुप मधून आम्ही चार डान्स बसवले आहोत.
वहिनी म्हणाली,बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे आणि तुझी वेगळी. दिप्ती म्हणाली, “वहिनी! काय ते स्पष्ट सांग?” वहिनी म्हणाली, “स्पष्ट काय सांगायचे दीप्ती..?” तुझं तुलाच कळायला हवं. आता दिप्ती जरा चिडूनच म्हणाली , “वहिनी..! प्लीज अशी कोड्यात न बोलता मला कळेल, समजेल ,अश्या भाषेत सांगितले तर खूप मेहरबानी होईल.”
वहिनी म्हणाली,”दिप्ती..! तुझ्या सारख्या तरुण विधवेला हे डान्सचे थेर करण शोभत का?”
लोक आमच्या तोंडात शेण घालतील.?
लगेच सासू कडे वळून म्हणाली,”आई..! तुम्हीच समजवा तुमच्या लाडक्या लेकीला.” कमावते न ,तर स्वतःला खूप शहाणी समजते. जनरीतीचे तिला भान नाही. पण आपण तर ठेवायलाच पाहिजे ना! लगेच आई वहिनीच्या सुरात सूर मिसळत म्हणाली. “दिप्ती! वहिनी अगदी बरोबर बोलते!” तू काही या डान्स बिन्स च्या भानगडीत पडू नको. त्यात तुझ्या सासरचे, जवळचे नातेवाईक इथे आपल्या गावात राहतात. लगेच निरोप जातो. तुझी सासू मग वाट्टेल तस तोंडसुख घेते. त्यापेशा नकोच बाई!
आता दिप्तीच्या संयमाचा बांध फुटला. म्हणाली आई ! वहिनी ! हे तुम्ही दोघी बोलताय ? आई ! अग तु सुद्धा हिची च री ओढते आहे. अग वहिनीच्याच वयाची मी. तिला नाही. निदान तू तरी माझा, माझ्या मनाचा विचार कर.
आई ! अग ! किती ? किती ? भोगल मी त्या घरात माझ मला माहित ? आई ,मी नोकरी करत होते. पण स्वतःच्या मर्जीने एक रुपया सुद्धा खर्च करायची परवानगी नव्हती. सगळा पगार बँकेतून काढून सासूच्या हातात द्यावा लागत होता. नवरा नावाला सुशिक्षित. रोज दारू ढोसून यायचा. त्याच्या मर्जीने वागायचा.
शारीरिक सुख ओरबाडून घ्यायचा. असं वाटायच जणू माझ्यावर रोज रोज फक्त बलात्कार होत आहे. आई…! त्याची मर्जी नाही राखली तर एक दिवस त्याने माझ्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले. अजूनही काळे व्रण आहेत.
दाखवू का?
तुम्हाला काही सांगायची सोयच नव्हती. कारण लग्न झाले त्याच दिवशी तू बोलली होती.
दिप्ती..! आता तेच तुझ घर! या घरी तू आता पाहुणी म्हणून चार दिवसासाठी यायच.
तुझे बाबा गेले. तुझा दादा तेव्हा जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता. तशीच त्याने नोकरी केली आणि या घराची विस्कटलेली घडी नीट बसवली. हे घर पुन्हा त्यान उभ केल. चांगल स्थळ पाहून तुझ लग्न करून दिल. तू आता तुझ्या तक्रारी घेऊन इथ येऊन. त्याच्या सुखी संसारात कधीच अडसर होऊ नको. शक्य तेवढे आपले प्रॉब्लेम आपणच सोडवायचा प्रयत्न कर. मग तेच करत राहिली…
सासुला एकदा सांगायचा प्रयत्न केला. तिने तर सगळा दोष माझ्याच माथी मारला . म्हणाल्या, आधी नव्हता पीत माझा पोरगा. तू आल्या पासूनच प्यायला लागला. वरून म्हणाल्या . चांडाळणी तूच काहीतरी केल माझ्या पोराला. पांढऱ्या पायाची कुठली.
जशी घरात आली घराची सुख – शांती – समाधान सगळंच लोप पावल. न जाणो कोणत्या मुहूर्तावर हि अवदसा माझ्या पोरांच्या गळ्यात पडली.
अस सासूने म्हटल की माझ्या नवऱ्याला जास्तच चेव यायचा. म्हणायचा वाटोळं केल माझं ! बरबाद झालो मी.
कुठून हि बला माझ्या पदरात पडली देवच जाणे! आणि पुन्हा दारू ढोसून यायचा…
बऱ्याच वेळा दारूची बाटली घरात घेऊन यायचा आणि पीत राहायचा. वरून त्याचे नखरे चकना म्हणून मच्छी फ्राय कर, सुक मटण कर, शेंगदाणे भाजून दे. इतक करून त्याच्या ग्लासात दारू सुद्धा ओतून दे. कधी कधी वाटायच. मी एक संसारी स्त्री आहे की ग्लासात दारू ओतणारी बारबाला. खूप प्यायला की वरून मारायचा. आई दोन वर्षे सहन केले मी आणि अजूनही करत होते. पण कधी ब्र काढला नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून.
एक दिवस रात्री अती पिऊन बाईक चालवत घरी येत होता. गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रकच्या खाली आला. देहाच्या नुसत्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. त्याच्या खिश्यातल्या ओळख पत्रावरून पोलिसांनी फोन करून सांगितले.
पोस्टमार्टम् झाल. डेड बॉडी घरी आणली. आई कसाही असला तरी तो माझा नवरा होता. एक दिवस सुधारेल या आशेवर जगत होते मी. डेड बॉडी पाहून खूप रडू आले. लगेच सासू बोलली, “नाटकी कुठली ?”
” आता कशाला रडते?”
आता तुला सगळ रान मोकळ ? इतका त्याचा जाच सहन करून, सासूची बोलणी खाऊन वरून मलाच दोष.
तुम्ही आल्यावर वेगळ्या वागत होत्या माझ्या सासूबाई.
तुम्ही सगळे तिसरा दिवस करून गेलात. सासू नावाच्या ह्या बाईने सगळा दोष मलाच द्यायच ठरवल होत. घरात चुलत सासरे, आत्या , सासूचे बहीण , भाऊ सगळेच पाहुणे होते. त्यानां रडून रडून सासू सांगत होती. हिच्या मुळे ,हिच्या मुळे माझा मुलगा गेला. ह्या अवदसेन कधी माझ्या मुलावर प्रेमच केल नाही. हीच बाहेर लफड होत. माझ्या पोराला कोणतंच सुख देत नव्हती. काकांकडे पाहून म्हणत होत्या. “तुम्ही पाहिल काहो भाऊजी तुमच्या पुतण्याला कधी दारू प्यायलेला? ” ,”दादा तू पाहिल कारे तुझ्या भाच्याला दारू प्यायलेलं?”. “या नागीणनं गिळल माझ्या लेकराला.”
आई मी इतक सगळ सहन केल. पण माझ्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे नाही सहन करू शकली. मग मी सगळ्यांना सागितले सासू आणि मेलेल्या नवऱ्याचे कारनामे. पण सगळे त्याचेच नातेवाईक. त्याचाच पुळका. तेरा दिवस जगणं मुस्किल करून टाकल.
सगळ्या विधी झाल्या. पंधरा दिवसाने ऑफिसला जायला निघाले. सासूबाई म्हणाल्या ते मंगळसूत्र आणि बांगड्या काढून जा. दिल्या काढून ,आता रोज काहींना काही खुस्पट काढून वाद घालणं चालूच. मग मी ठरवल माहेरी येऊन रहायच. नोकरी करून स्वतःच पोट भरायच. नवरा मेलेली विधवा मी, इथे आल्यावर पुन्हा टिकली , लिपस्टिक, मंगळसूत्र घालायला लागली. लोकांच्या वाईट नजरेतून बचाव करण्यासाठी.
तर वहिनी त्यावरून पण किती बोलली. ते सुद्धा सहन केल. पण आता तुम्ही माझ्या जगण्यावरच प्रतिबंध घालू इच्छिता. हे मी कदापी सहन करणार नाही.
आणि तुमचे असेच विचार असेल तर, मी उद्या पासून मागच्या बाजूने एक रूम आहे तिथे राहते ,आणि हो लवकरच दुसरी खोली घेऊन तिकडे राहायला जाणार. अजून एक…
आई..! वहिनी..! माझ्या ऑफिस मधला एक माझा मित्र त्याने मला लग्नाची मागणी घातली. खरतर माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. पण हो. आता नक्की विचार करेन. तो सुद्धा लवकरात लवकर. त्याची बायको सुद्धा त्याला सोडून गेली. त्याचा आत्ताच घटस्फोट झाला. आमची दोघांची छान मैत्री आहे. ऑफिस मधील सगळेच या बद्दल मला म्हणतात. दिप्ती! थोडा स्वतःचा विचार कर! पुढील आयुष्य एकटीने काढण कठीण असते..! पण आई…मी तुझा, दादाचा विचार करीत होते. पण नाही. आता नाही, आता फक्त स्वतःचा विचार करणार.
सहा महिने झाले आई मला इथे येऊन पण मला आठवत नाही तू , दादा किंवा वहिनी माझ्या सोबत चांगले वागले की चांगले बोलले. किती निश्चयाने मी माहेरी आले होते. वाटल मला तुमचा आधार मिळेल. पण नाही , प्रत्येक गोष्टीत रोक टोक. तू विधवा आहे. असं नको करू. कोणत्या शुभ प्रसंगी तू पुढे नको होऊ. कुणाला ओवाळू नको. सकाळी सकाळी कोणाला तोंड बाहेर दाखवू नको. विधवा सकाळी सकाळी पाहिली की दिवस खराब जातो. मग आम्हाला बोलणी खावी लागते.
किती? किती ? हे खालचे विचार. तुमच्या पैकी कुणीही त्यांना खडसावून सांगत नाही . ती तरुण वयात विधवा झाली त्यात तिचा काय दोष. उलट लोकांना खतपाणी घालता.
आता मला सांग आई, बाबा जाऊन किती वर्षे झाली. माझे सासरे पण जाऊन चार वर्षे झाली. पण तू , माझी सासू मात्र अशुभ नाही. आई, तुझ्याच कडे पाहून आमचा दिवस उगवायचा आणि मावळायचा. माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला बाबा गेल्यानंतरही तूच ओवाळायची न आई. एका विधवेला रोज पाहत होते. सासरी आणि मोहरी पण. म्हणून माझ्याही आयुष्यात असे अशुभ प्रसंग आले का आई…आई …प्लीज ..! बोल आई..! माझ्या आणि दादाच्या डोक्यात असे कधीही आले नाही. तू विधवा आहेस. वहिनीला तुला सकाळी सकाळी पाहिलेल चालत. पण मला नाही. तरुणपणी काहीही चूक नसतांना. विधवा होण त्यात त्या मुलीची काय चूक आई..?
मी तरुण , विधवा अपशकुनी. पण तू नाही. कारण तू संसार पाहिला, अनुभवला, आणि जगला. माझा डाव सुरु व्हायच्या आधीच मोडला.
मी मात्र विधवा, अपशकुनी. काय विचारसरणी आहे तुमची..?
आई.तू माझी आई असूनही इतके खालचे विचार. खरतर मी तुमच्या आधाराने इथे राहायला आले. पण तुम्ही माझ्या हातातली काठी न होता,मला मारायला उचललेली लाठी होऊ पाहता. मी हे कदापीही सहन करणार नाही.
आई..! आज निक्षून सांगते. ज्यात माझी चूकच नाही. त्याची अशी शिक्षा सुद्धा मी भोगणार नाही.
कुणाला काय वाटेल? कुणी काय म्हणेल ? याचा विचार करण मी आता सोडून दिलंय.
आई..! आता फक्त स्वतःचा विचार करणार आणि स्वतःसाठी जगणार आहे मी.
वहिनी! मला इतका त्रास होता. समाजातील एकही जण कधी विचारायला आला नाही..सगळं दुःख एकटीने भोगले.मग आता जरा आनंदी राहायचा प्रयत्न करते तर समाज मनाला इतका त्रास का होतो?
लोक काय म्हणतील?
या साठी मी का म्हणून माझं जगणं सोडू?
आई..! वहिनी..! मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे, आणि विधवा असली तरी मला सुद्धा मन आहे.
दिप्ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागली.
एकच म्हणत होती, “मला सुद्धा मन आहे”.
“आई.! मला सुद्धा मन आहे ग!”
प्लीज कधीतरी मलाही समजून घे..!
आई तुझ्या लेकीला समजून घे..!
आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नकळत आईचे सुध्दा डोळे पाणावले. वहिनी सुद्धा डोळ्याच्या कडा पुसत होती.
दिप्ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. “कुणीतरी मला समजून घ्या..?” “मलाही मन आहे!, मलाही मन आहे..!”
लेखिका – सौ प्रभा कृष्णा निपाणे,कल्याण
