वाढदिवसाचा खर्च टाळत सभापती अशोक पाटील यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांची मदत!…..दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार; ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटला की जल्लोष, सत्कार, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छांची रेलचेल असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, राज्यातील आणि विशेषतः अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि भविष्यातील संभाव्य संकटांचा विचार करून सभापती अशोक पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले शुभेच्छांचे बॅनर काढून टाकावेत, अशा सूचना दिल्या होत्या. बाजार समितीतील शेतकरी, कर्मचारीवृंद, हमाल-मापाडी आणि व्यापारी बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती पाहता उत्सवापेक्षा गरजूंसाठी मदत महत्त्वाची असल्याची भूमिका त्यांनी घेतली.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ तसेच अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द केला.
विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याची भेट
केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता दुष्काळाचे चटके ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसू नयेत, या भावनेतून सभापती अशोक पाटील यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा अशोक पाटील यांचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा सामाजिक योगदानाला प्राधान्य देणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.