अमळनेर रेल्वे हद्दीत घाणीचे साम्राज्य; भंगार जाळून हवेत विष कालवण्याचा प्रकार, रेल्वे प्रशासन लक्ष देईल का?

अमळनेर (प्रेमकुमार सासनानी): येथील तांबेपुरा-विप्रो रोड परिसरातील रेल्वे स्टेशन गेट क्रमांक २ च्या परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात काही भंगार विक्रेत्यांनी अनधिकृत अतिक्रमण केले असून, दररोज टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी त्या गेटच्या आत सर्रास जाळल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांबेपुरा व विप्रो रोडला जोडणाऱ्या गेट क्रमांक २ च्या आसपास भंगार व्यवसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. भंगारातून उरणारे निरुपयोगी साहित्य, विशेषतः रबर आणि प्लास्टिकच्या पिशव्या, रेल्वेच्या हद्दीत नेऊन खुलेआम जाळल्या जातात. प्लास्टिक आणि रबर जळाल्यामुळे परिसरात प्रचंड काळसर धूर पसरतो आणि असह्य दुर्गंधी निर्माण होते.

या विषारी धुरामुळे स्थानिक रहिवासी, पादचारी आणि दुचाकीस्वारांना डोळ्यांची जळजळ व श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण परिसर प्रदूषित होत असतानाही संबंधितांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.

रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकण्यास व तो जाळण्यास सक्त मनाई असताना हा गैरप्रकार राजरोस सुरू कसा? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हे अतिक्रमण हटवावे तसेच रात्री-अपरात्री प्लॅस्टिक जाळणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!