दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अमोलभाऊ भागवत आक्रमक; मुख्यमंत्रीस्तरीय बैठकीची मागणी  नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निवेदन; पाणी, अन्नधान्य आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी स्वतंत्र नियोजनाची मागणी

 नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. समितीचे जनरल सेक्रेटरी तथा नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याशी चर्चा करून दुष्काळग्रस्तांसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली.

राज्याच्या विविध भागांत दुष्काळाचे सावट गडद होत असताना शासनाच्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, दुष्काळग्रस्तांना मिळणारी मदत आणि आगामी काळातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष शर्मा कार्यालयात उपस्थित नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती, प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना आणि जनतेच्या विविध समस्यांबाबत मुद्देसूदपणे भूमिका मांडण्यात आली.

 पाणी, अन्नधान्य आणि चाऱ्यासाठी ठोस कृती आराखडा हवा!

दुष्काळग्रस्त भागांत आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई, अन्नधान्याचा संभाव्य तुटवडा, जनावरांच्या चाऱ्याची समस्या आणि वाढत्या महागाईचा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ठोस व स्वतंत्र कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी समितीने केली. केवळ घोषणा न करता गरजूंपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

 मुख्यमंत्री यांच्यासोबत विशेष बैठक घेण्याची मागणी

समितीने दुष्काळग्रस्तांसाठी स्वतंत्र नियोजनाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागांतील जनतेच्या गंभीर समस्या, त्यावरील उपाययोजना आणि समितीच्या नियोजनाचा सविस्तर आढावा मांडण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या चर्चेत महिला प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, नाशिक जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ मंडलिक, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्रजी मगर, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, उपाध्यक्ष ज्योतीताई परदेशी, जनसेविका आशाताई भोईर, दिपालीताई वाणी, मनीषाताई भुजबळ, अंजलीताई जाधव, दिव्यांग अध्यक्ष सुरदास पावसे, जिल्हा सचिव सुनीताताई गांगुर्डे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर यांच्यासह दिलीप गायकवाड, राहुल मोरे, श्यामआप्पा डावरे, मनीषाताई पंचाक्षरी, जगनभाऊ पवार, संजय नाना बलकवडे, बिस्मिल्ला खान, राजूभाऊ मांडे, राजाभाऊ सिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चर्चेनंतर समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी आणि प्रशासनाने संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, अशी भूमिका मांडली.

  “माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया,” या भावनेतून गरजू नागरिकांना दिलासा मिळावा आणि दुष्काळ निवारणासाठी ठोस कृती व्हावी, यासाठी समितीने पुढाकार घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!