पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम; प्रा. शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन……सकारात्मक ऊर्जा, निस्वार्थ कर्म आणि संयमातूनच जीवनाला अर्थ: प्रा. शिवाजीराव पाटील

अमळनेर  : पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात प्रा. पाटील म्हणाले की, रामायण आणि महाभारतात युद्धाचे प्रसंग असले तरी त्यातून आपल्याला सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या पालनाचाच संदेश मिळतो. ‘हात कमरेवर ठेवून उभा असलेला विठ्ठल’ हा कर्म, संयम आणि भक्तीचे प्रतीक असल्याने तो प्रत्येकाला अधिक जवळचा वाटतो. भौतिकशास्त्राचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, दगडाला योग्य दिशा आणि बाह्यबल मिळाले की त्यातून सुंदर मूर्ती घडते, तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. “कोण म्हणतं आकाशाला छेद पडत नाही, एकदा दगड उचलून तर पाहा…” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.

निस्वार्थ कर्माची प्रेरणा आणि विज्ञानाचा समतोल

सूर्य आणि चंद्र कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अखंड कार्य करतात, त्यांच्याकडून निस्वार्थ कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगत त्यांनी ‘जसे कर्म तसे फळ’ हा निसर्गाचा अटळ नियम असल्याचे स्पष्ट केले. तसेच चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी विज्ञान, तर्क आणि अध्यात्म यांचा योग्य समतोल साधण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी आपापसात संवाद साधताना इतरांविषयी वाईट बोलणे टाळावे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

गीतगायन व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता

या बैठकीस सचिव एस. एम. पाटील, सहसचिव श्रावण पाटील, उपाध्यक्ष उमाकांत नाईक, देविदास जगताप, सुधाकर पवार, गोविंद चित्ते, प्रकाश सोनवणे यांच्यासह संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान काही सदस्यांनी सुरेल गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. पाटील यांनी केले, तर प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी सादर केलेल्या पसायदानाने बैठकीची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!