अंमळनेर : आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अंमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या सोहळ्याचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला.

तीन महाविद्यालयांच्या स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
या पर्यावरणपूरक उपक्रमात शहरातील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी मोठा उत्साह दाखवला. तिन्ही महाविद्यालयांतून प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांनी सहभागी होत संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि स्वच्छता अभियान यशस्वी केले.
परिसर स्वच्छता अन् दर्शनासाठी मदत
उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी तुळशीबाग परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा वेचून परिसर चकाचक केला. केवळ स्वच्छता न करता, उपस्थित वारकरी आणि नागरिकांना “स्वच्छ वारी, हरित वारी”चा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता अभियानानंतर, पालखी सोहळ्यात आलेल्या हजारो भाविकांना संत सखाराम महाराजांचे दर्शन शिस्तीत आणि सुलभतेने घेता यावे, यासाठी स्वयंसेवकांनी चोख नियोजन करत मदतीचा हात दिला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या स्तुत्य उपक्रमाच्या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रताप महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील राजपूत, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली राठोड, तसेच समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर यांच्यासह तिन्ही महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण पिढीमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश!
“कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून वारकरी आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश पोहोचत असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास याची मोठी मदत होत आहे.”
– प्रा. डॉ. संदीप नेरकर (सिनेट सदस्य, कबाचौ उमवि)
