स्वच्छ भारत अभियान २.०: अमळनेरमध्ये कचरा वेचकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

    अमळनेर: स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘क्षमता बांधणी’ घटकाचा भाग म्हणून अमळनेर नगर परिषद हद्दीतील कचरा वेचकांसाठी बुधवारी, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते ५.३० या वेळेत हा उपक्रम पार पडला.

महत्त्वाच्या योजनांचे मार्गदर्शन

       मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. श्री. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत कचरा वेचकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त ‘कुशाग्र फाउंडेशन’च्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. यात प्रामुख्याने:

नमस्ते योजना व NULM
​ई-श्रम कार्ड व आधार कार्ड नोंदणी
​बचत गटांची स्थापना

​घनकचरा व्यवस्थापनातील व्यवसायाच्या नवीन संधी

​RRR (Reduce, Reuse, Recycle) केंद्र संकल्पना
​जागतिक पृथ्वी दिनानिमित्त ‘हरित शपथ’

     योगायोगाने आज ‘जागतिक पृथ्वी दिवस’ असल्याने, उपस्थितांना वातावरणीय बदल आणि घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ‘हरित शपथ’ घेतली. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

सहभागी व उपस्थित मान्यवर

      या प्रशिक्षणात शहरातील घंटागाडी चालक, मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील कर्मचारी आणि सुपरवायझर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाउंडेशनचे श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर उपस्थित होते. तसेच युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, घनकचरा सुपरवायझर श्री. खलील शहा आणि राजेंद्र गोलहीत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कचरा वेचकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!