अमळनेर/दहिवद: ज्या काळात अज्ञानाचा अंधार होता आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, अशा काळात क्रांतीची मशाल पेटवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहिवद बुद्रुक येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
या मंगल दिनाचे औचित्य साधून गावातील माजी सरपंच श्री. देवानंद बहारे यांच्या वतीने गावातील सर्व स्तरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या आणि पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, शाळेचे माजी अध्यक्ष श्री. अनिल महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी महामानवाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले. “बाबासाहेब केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे. तुम्ही आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, म्हणूनच आज आम्ही शाळेची पायरी चढू शकलो,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रेरणादायी भाषणे केली.
प्रेरणादायी उपक्रम
शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. गतकाळातील युवा प्रशिक्षणार्थी श्री. भागवत सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
डॉ. बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राचा जागर करत, प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना जागृत करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणारदायी ठरला. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
