नाशिक | येवला: राज्यात वाढत्या भोंदूगिरीमुळे सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक आणि शोषण थांबवण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. “गावोगावी भोंदूबाबांना थारा देऊ नका, त्यांना थेट गावबंदी करा,” असा इशारा समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी दिला आहे.

समितीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या पथकात विशेष अधिकार असलेले पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
अमोलभाऊ भागवत यावेळी म्हणाले की, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली जात आहेत. याला आळा घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक लूट करणाऱ्या भामट्यांवर कडक कारवाईसाठी स्वतंत्र विजिलेंस अधिकारी नेमावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
