जळगाव : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने गुरुवार पासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर साखळी उपोषण सुरू केले होते .संघटनेचे समन्यवक एच. डी.भारूड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होते . शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले असतानाही प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप व्यासपीठाने केला आहे.अनेक महत्त्वाची प्रकरणे मंजूर न करणे, वेतन पथकांकडून सातत्याने अपूर्ण माहिती दिली जाणे, टप्पा अनुदांन आदेशाचे वाटप करण्यात मोठा विलंब होणे, माध्यमिक शिक्षण विभागातील काही अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने कार्यालयाचे कामकाज इतर ठिकाणाहून चालते. यामुळे आपले काम करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांना तासन् तास आवारात ताटकळत बसावे लागते, तरीही त्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. शिक्षण विभागाच्या या ‘भोंगळ आणि टाळाटाळीच्या’ कारभाराला कंटाळून अखेर संघटनेने उपोषणाचे अस्त्र उपसले होते .

जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने जोपर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर होत नाहीत आणि सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपपोषण सुरूच ठेवण्याचा ठाम पवित्रा घेतला होता . दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी तातडीने उपपोषणस्थळी भेट दिली. त्याप्रसंगी संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या समक्ष व त्यांच्या हस्ते पत्र दिल्यामुळे त्यांनी उपपोषणकर्त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि येत्या एक आठवड्याच्या आत त्यांच्या सर्व तक्रारी व प्रलंबित प्रश्न सोडविले जातील, असे ठोस आश्वासन दिल्यामुळे तूर्त उपोषण स्थगित करण्यात आले.

