अमळनेर, दि. ३० : येथील बोरी नदीच्या पात्रात आज अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा मंगल प्रारंभ झाला. हभप प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता स्तंभारोपण आणि समाधी मंदिरांवर ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता ताई वाघ, सौ. जयश्री अनिल पाटील, विनोद भैय्या पाटील, डॉ. अनिल शिंदे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,नगरपरिषद मुख्याधिकारी, डी.वाय.एस.पी विनायक कोते, पुरोहित मंडळी, तसेच अमळनेर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक मान्यवर, भक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रोत्सवामध्ये ३० एप्रिल ते ७ मे दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत तुकाराम महाराज गाथा भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी ३ ते ५ मे दरम्यान जिल्हास्तरीय भजन स्पर्धा रंगणार आहे. ६ मे रोजी हभप प्रल्हाद महाराज पुण्यतिथी असून यानिमित्ताने हभप जयदेव बुवा गुरव यांचे कीर्तन आयोजित केले आहे. ७ मे रोजी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे आगमन होणार असून, याच काळात बोरी नदीच्या वाळवंटात यात्रेचे आकर्षण अधिक वाढेल.
या यात्रेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मनोरंजनासाठी झोके, पाळणे, जायंट व्हील तसेच घरगुती वस्तूंच्या दुकानांची रेलचेल असणार आहे. विद्युत रोषणाईने नटलेले यात्रास्थळ भाविकांना एक अद्भुत अनुभव देईल. यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक येत असतात.
यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ८ मे रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या सायंकाळी ७.३० वाजता होणारा भव्य रथोत्सव. रथाची मिरवणूक वाडी चौक, विठ्ठल मंदिर, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड, पैलाड मार्गे बोरी नदीच्या दिशेने जाईल. या मिरवणुकीत बागलाण तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक कला मंडळ विशेष सादरीकरण करणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त ११ मे रोजी वाडी चौकात मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १२ मे रोजी सकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक (रथ मार्गाप्रमाणेच) निघेल, ज्यात भुसावळ व चाळीसगाव येथील बँड पथक विशेष आकर्षण असेल. १३ मे रोजी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होईल.
बोरी नदीच्या पात्रातील ही यात्रा सुमारे १५ दिवस भरणार असून, हा उत्सव केवळ श्रद्धेचा नसून संस्कृती, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संगम आहे. हभप प्रसाद महाराज, गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सखाराम महाराज संस्थान यांनी सर्व भाविकांना या दिव्य सोहळ्याचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन केले आहे.
