अमळनेर येथील बस स्थानकाजवळ अलीकडेच प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबवली होती. या कारवाईत अनेक रहिवाशांना त्यांच्या निवासस्थानावरून हटविण्यात आले. त्यापैकीच एक धुडकू मराठे हे होते, जे आपल्या टपरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत होते. अतिक्रमण हटविल्यानंतर त्यांनी उघड्यावरच तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे हळहळ ….
धुडकू मराठे यांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविले खरे, परंतु या रहिवाशांसाठी कोणतीही पुनर्वसनाची व्यवस्था केली नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर या नागरिकांचे काय होणार, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही, ही बाब आता चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अतिक्रमण हटविल्यानंतर बेघर झालेल्या नागरिकांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? अशा परिस्थितीत गरीब आणि असहाय्य नागरिकांचे काय होणार? याबाबत प्रशासनाने तत्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
