अमळनेर (विशेष प्रतिनिधी): अमळनेर नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत व पथदिव्यांच्या खांबांवर बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेल्या सुमारे ४०० ते ५०० अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जवर तत्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र अनिल संदानशिव यांनी पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्टेशन यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

अपघाताची शक्यता व सुरक्षेचा प्रश्न
शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक व होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे कोसळून पादचारी, वाहनधारक व नागरिकांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विद्युत खांब व सार्वजनिक रस्त्यांचा असा अनधिकृत वापर सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विविध कलमान्वये कारवाईची मागणी
या निवेदनात संबंधितांवर खालील कायदेशीर तरतुदींनुसार तपास करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे:
* महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५: कलम ३ व ४ अन्वये सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
* भारतीय न्याय संहिता, २०२३: कलम २८५ अन्वये सार्वजनिक मार्गावर धोका अथवा अडथळा निर्माण केल्याबद्दल कारवाई करावी.
* भारतीय न्याय संहिता, २०२३: कलम १२५ अन्वये निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी.
