अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाची सभा; मतदार याद्यांच्या पुनरावलोकनावर भर……गावोगावी, वॉर्डावॉर्डात जाऊन मतदार याद्यांची तपासणी करण्याचे हिम्मत सिंह यांचे आवाहन

     अमळनेर शहर प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाच्या प्रसारासाठी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील टाऊन हॉलमध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी मतदार याद्यांचे पुनरावलोकन, निवडणूक प्रक्रिया, बेरोजगारी, पेपरफुटी प्रकरण आणि महाराष्ट्रातील दुष्काळ यांसह विविध राजकीय, सामाजिक व आर्थिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

      सभेचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दला पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सुलोचना वाघ, ॲड. रजक शेख, कृषिभूषण सुरेश पीरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील आणि माजी काँग्रेस शहराध्यक्ष लोटन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

      वक्त्यांनी महाराष्ट्रासह देशातील सद्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, ‘वोट चोरी’चे आरोप, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमाबाबत (एसआयआर) पक्षाची भूमिका, बेरोजगारी, पेपरफुटीची प्रकरणे आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती या विषयांवर चर्चा झाली. एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी मांडण्यात आली.

डॉ. पूनम सोनवणे यांचा सत्कार

        अमळनेर महिला काँग्रेसच्या नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. पूनम सोनवणे यांचा सत्कार जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम भाग) अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीतील बदलांचा आढावा घेतला. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त काँग्रेस समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘मतदार यादीत नाव आहे की नाही, याची खात्री करा’

      प्रमुख मार्गदर्शक हिम्मत सिंह यांनी मतदारांची नावे वगळली जाणे आणि मतचोरीचे कथित प्रकार यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडली. ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाची अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांनी गावोगावी आणि वॉर्डावॉर्डात जाऊन मतदार याद्यांची तपासणी करावी. ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत, त्यांच्या नावांचा समावेश व्हावा यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

     पक्ष संघटनेचे काम करताना राहुल गांधी यांच्या ‘डरो मत’ या संदेशानुसार निर्भयपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ईव्हीएमबाबतचे मुद्दे राहुल गांधी टप्प्याटप्प्याने समोर आणणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

     या सभेला ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, प्रताप पाटील, भगवान संदानशिव, दिलीप साहेबराव पाटील, तुषार संदानशिव, के. व्ही. पाटील, ताराचंद सूर्यवंशी, डॉ. रवींद्र पाटील, गोकुळ पाटील, प्रवीण पाटील, सईद तेली, राजू चंडाले, सुभाष शिंदे, पितांबर पाटील, आरिफ बागवान, तौसीब तेली, रोहिदास पाटील, श्रीराम पाटील, राकेश पवार, पी. वाय. पाटील, बन्सीलाल भागवत, ॲड. गिरीश पाटील, सादर बागवान, उमेश संधानशिव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सभेचे आभार प्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!