अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अंतुर्ली–रंजाणे परिसरासह संपूर्ण तालुक्यात दहशत माजवणाऱ्या आणि चार ते पाच पाळीव जनावरांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन राबवलेली अहोरात्र शोधमोहीम यशस्वी ठरली असून, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतुर्ली रस्त्यावरील कबरस्तान परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, वनविभागाच्या तत्पर व धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

