स्वच्छता ही सेवा – SHS 2026’ अंतर्गत गांधी जयंतीनिमित्त अमळनेर बसस्थानकावर स्वच्छता अभियान;  प्रताप महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर : महात्मा गांधी जयंती निमित्त प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने अमळनेर बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सार्वजनिक परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.

भारत सरकारच्या रासेयो क्षेत्रीय संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा – SHS 2026’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही या मोहिमेची संकल्पना असून, १ ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या देशव्यापी श्रमदान उपक्रमांतर्गत प्रताप महाविद्यालयाच्या NSS विभागाने हा उपक्रम आयोजित केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘स्वच्छता हीच सेवा आहे’ असे सांगितले. प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करून आपला परिसर, गाव आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत. तसेच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छतेमुळे रोगराईला प्रतिबंध होण्यास मदत होत असल्याने स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता राखण्याची आणि इतरांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची शपथ घेतली. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील राजपूत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. जयेश साळवे आणि मोठ्या संख्येने NSS स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या अभियानातून सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!