पूराने संसार उद्ध्वस्त, प्रशासनाने मदतीचा हात द्यावा; अन्यथा आंदोलन अटळ!…..१८ ते २० कुटुंबांची सामूहिक मागणी

   अमळनेर  :  तालुक्यातील मौजे एकलहरे व परिसरातील सुमारे १८ ते २० कुटुंबांना नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व कौटुंबिक नुकसान सहन करावे लागले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, फर्निचर, भांडीकुंडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच वाहने व पशुधनाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पूरग्रस्त नागरिकांनी अमळनेर तहसीलदारांकडे सामूहिक निवेदनाद्वारे केली आहे.

     पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांतील भांडीकुंडी, कपडे, फर्निचर, अन्नधान्याचा साठा तसेच घरगुती वापराच्या वस्तू खराब झाल्या असून काही वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दुचाकी, चारचाकी व इतर वाहने पुराच्या पाण्यामुळे खराब झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

     याशिवाय बकऱ्या, कोंबड्या व अन्य पशुधनाचा मृत्यू अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक गरीब कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन हिरावले आहे. त्यामुळे संबंधित पशुधनाचे पंचनामे करून शासनाच्या प्रचलित दरानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    पूरग्रस्तांनी प्रत्येक घराची प्रत्यक्ष पाहणी करून गावनिहाय व कुटुंबनिहाय पंचनामे करावेत, घरांचे बांधकाम, भिंती, छप्पर, घरगुती साहित्य, धान्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने व पशुधनाच्या नुकसानीची स्वतंत्र नोंद घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच खराब झालेले धान्य व जीवनावश्यक वस्तूंची नोंद करून पात्र कुटुंबांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

    “केवळ कागदोपत्री पंचनामे न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. प्रत्येक पात्र पूरग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व सर्व शक्य शासकीय मदत तातडीने मिळावी,” अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.

     दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई व आर्थिक मदत न दिल्यास पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

     निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना देण्यात आल्या आहेत.

     याप्रसंगी भारती कोळी उषा भिल, ज्योती कोळी,जयश्री भिल,आशा भिल,नर्मदा भिल, कोमल भिल, भुराबाई भिल,लताबाई भिल,माया भिल, सोमनाई भिल,भिराबाई भिल, शोभा भिल,जिजाबाई भिल, संगीता भिल यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!