अमळनेर शहरातील नाल्यांची तातडीने पाहणी, मोजणी व खोलीकरण करा – शिवसेनेची मागणी

   अमळनेर : शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य नाले तसेच पिंपळे रोड परिसरातील नाल्यांची तातडीने पाहणी करून अधिकृत मोजणी, रुंदीकरण व खोलीकरण करावे, तसेच अनधिकृत अतिक्रमणे हटवून कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख भरत प्रकाश पवार यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्य नाले व पिंपळे रोड परिसरातील नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता अपुरी पडत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. नाल्यांची मूळ रुंदी व खोली कमी होणे, नाल्यांच्या परिसरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तसेच पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला निर्माण झालेले अडथळे यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

यामुळे नाल्यांची तातडीने संयुक्त पाहणी व अधिकृत मोजणी करून आवश्यक त्या ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण करावे. तसेच नाल्यांवर अथवा परिसरात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण करणारी अनधिकृत अतिक्रमणे व बांधकामे नियमानुसार हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख नाल्यांमधील गाळ, कचरा, झाडेझुडपे व इतर अडथळे तातडीने काढून जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी व तहसीलदार, अमळनेर यांनाही देण्यात आल्या आहेत. आगामी काळात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी व शास्त्रीय जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!