रोटरी क्लब अमळनेरच्या नूतन वर्षाची दमदार सुरुवात; कृषी दिनी बळीराजाचा सन्मान, तर शालेय विद्यार्थ्यांना २००० ‘सीड बॉल’चे वाटप!…….अन्नदाता आणि पर्यावरणाचा अनोखा मेळ; रोटरी क्लब आणि हाऊसिंग महिला ट्रस्टचा कौतुकास्पद संयुक्त उपक्रम

अमळनेर  :  रोटरी इंटरनॅशनलच्या नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, रोटरी क्लब अमळनेरने आपली उज्ज्वल समाजसेवेची परंपरा कायम राखत एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून कामाची जोमाने सुरुवात केली आहे. रोटरीचे नूतन अध्यक्ष महेश पाटील व नूतन सचिव तथा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘सीड बॉल’ (Seed Balls) वाटपाचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला.

​बळीराजाला कृतज्ञतेची ‘पुष्प’ गुच्छ शुभेच्छा

​देशाच्या आर्थिक भरभराटीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अन्नदात्याचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे शेतकरी बंधूंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी तांबेपुरा, रंजाने, तासखेडा आणि नंदगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने संजय पाटील, भरत पाटील, सुकलाल पाटील, शालिक पाटील आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.
​शाळकरी मुलांच्या हाती सुपूर्द केले २ हजार ‘सीड बॉल’
​पर्यावरण व वृक्ष संवर्धन मोहिमेचा एक भाग म्हणून रोटरी क्लब अमळनेर आणि हाऊसिंग महिला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल २ हजार सीड बॉलचे वितरण करण्यात आले. पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल आणि डी. आर. कन्या हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना हे सीड बॉल वाटण्यात आले, जेणेकरून पावसाळ्यात या माध्यमातून वृक्षारोपणाला गती मिळेल.

​याप्रसंगी पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. देवरे सर, पी. ए. वंजारी, कु. एम. एस. बारी तसेच डी. आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम यांच्यासह शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

​रोटेरियन्स आणि महिला ट्रस्टचा मोठा सहभाग

दोन्ही उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे नूतन अध्यक्ष महेश पाटील, सचिव प्रशांत निकम, चेलाराम सेनानी, डॉक्टर अनिल वाणी, सनी कोठारी, प्रीत पाल सिंग बग्गा, अजय रोडगे, आशिष चौधरी आदी रोटेरियन्स व हाऊसिंग ट्रस्टच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती रोटरीचे पदाधिकारी मकसूद बोहरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!