बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करून महाराष्ट्र बंदी घाला; अमळनेर तालुका काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

अमळनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी अमळनेर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी भागवत केशव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

निवेदनात म्हटले आहे की, एका कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीचे वक्तव्य केले. यामुळे महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या कार्यक्रमात हे विधान झाले, तिथे उपस्थित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांनी याला विरोध न करता बघ्याची भूमिका घेतली, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

तरुणांना अंधश्रद्धेकडे लोटण्याचे षडयंत्र

निवेदनात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका करण्यात आली आहे. “भारत हा तरुणांचा देश आहे. सरकारने तरुणांच्या बुद्धीचा आणि ताकदीचा वापर देशाच्या विकासासाठी करणे अपेक्षित असताना, त्यांना देव-धर्म, गंडा-दोरे आणि उपास-तापास अशा गोष्टींत गुंतवून विज्ञानवादी दृष्टिकोनापासून दूर ठेवले जात आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे.

लोकशाही मूल्यांची पायमल्ली

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्ष ईडी आणि इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणांचा वापर करून पक्षवाढ करत आहे. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या होणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचेही सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रमुख मागण्या:

धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.

महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी.

या निवेदनाद्वारे काँग्रेस पक्षाने आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती तहसीलदारांना केली आहे. यावेळी संदिप घोरपडे,पी.वाय पाटील ,रामकृष्ण पाटील,बन्सीलाल भागवत ,गुणवंतराव पाटील, प्रार्थराज पाटील,सुभाष शिंदे,प्रा. शाम पवार, मुरलीधर पाटील,सईद तेली,राजेन्द्र भाट,तौसिफ तेली, शरद पाटील,राजेंद्र पाटील,त्र्यंबक पाटील,राजेंद्र चौधरी, भगवान संदानशिव, काशिनाथ पाटील, शांताराम पाटील,माजी नगरसेवक मनोज पाटील, कन्हैयालाल कापडे, प्रविण पाटील, रोहिदास कापडे सह काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!