बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग

     जळगाव : भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या तीव्र जनजागृती मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. या मोहिमेचा समारोप कार्यक्रम नुकताच पार पडला.

     या मोहिमेत आधार बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी सक्रिय सहभाग घेत जिल्ह्यातील गावोगावी आणि शहरांमध्ये जाऊन बालविवाहविरोधी संदेश पोहोचवला.

     बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम तसेच बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली.

    सदर मोहीम Just Rights for Children या देशातील २५० पेक्षा अधिक बालहक्क संस्थांच्या नेटवर्कच्या सहकार्याने राबविण्यात आली. देशातील ४३९ जिल्ह्यांमध्ये बालविवाह निर्मूलनासाठी ‘बालविवाह मुक्ती रथ’ द्वारे जनजागृती करण्यात आली.

     जळगाव जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत विविध गावे, शैक्षणिक संस्था आणि पंचायत स्तरावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. तसेच नागरिकांना बालविवाह न करण्याची आणि न होऊ देण्याची शपथ देण्यात आली.

मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात आली

पहिल्या टप्प्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. 

दुसऱ्या टप्प्यात धार्मिक नेते तसेच विवाहाशी संबंधित सेवा पुरवठादार – केटरर्स, डेकोरेटर्स, बँड, हॉल मालक आदींना बालविवाहात सहकार्य न करण्याचे आवाहन करण्यात आले. 

तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

या प्रसंगी आधार बहुउद्देशीय संस्थाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, बालविवाह ही केवळ सामाजिक कुप्रथा नसून मुलींच्या हक्कांवर आघात करणारा गंभीर गुन्हा आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून बालविवाहमुक्त जळगाव जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प या मोहिमेद्वारे दृढ करण्यात आला, अशी माहीती जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्पचे जिल्हा प्रकल्प समन्वयक आनंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!