अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रेत कापड विक्रेत्याला मारहाण करून लुटणाऱ्या तिघानां पकडण्यात यश मिळाले आहे.

सविस्तर वृत्त की, संत सखाराम महाराज यात्रेत बोरी नदी पात्रात धुळे येथील कापड व्यापारी अरशद अकबर शहा व त्याचा भाऊ अफजल याने कपड्याचे दुकान लावले आहे. रात्री तीन वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम त्यांच्या दुकानाच्या बाहेर भांडण करत होते. म्हणून अर्षद व त्याचा भाऊ भांडण करणाऱ्यांना जाब विचारलाचा राग आल्याने एकाने हातातील लाकडी बॅट अर्षद च्या डोक्यात व पाठीवर मारुन दुखापत केली.दोन्ही भावाना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील ५ हजार २०० रुपयांची पिशवी पळवून नेली.
सदर घटनेची तक्रार स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मुक्तार खाटीक यांच्या मदतीने अर्षद याने अमळनेर पोलीस स्टेशनला तीन अज्ञात व्यक्तीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ , ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस निरीक्षक राजू जाधव , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , प्रशांत पाटील , निलेश मोरे यांच्या पथकाला संशयित तरुणांच्या शोध घेऊन मुसक्या आवळण्या कामी रवाना केले. सदर पथकाने सतीश पुनमचंद पाटील, रा शनीपेठ पैलाड , चेतन उर्फ सत्तू किरण धोबी, रा शिवाजीनगर पैलाड , शंकर संजय पाटील, रा कृष्णा पेट्रोलपंप जवळ पैलाड याना ताब्यात घेऊन पोलिसी भाषेत विचारपूस केली असता त्यांनी लुबाडणूक केल्याची कबुली दिली. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
