प्रताप मध्ये समाजमाध्यमे आणि आजची तरुणाई या विषयावर व्याख्यान संपन्न
अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रताप महाविद्यालय आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. रवींद्र पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, सामाजिक माध्यम स्थळे वापरतांना तरुणाईने भान ठेवले पाहिजे. मोबाईलमुळे वेळ जातो, विद्यार्थ्यांनी वेळेचे चांगले नियोजन केले पाहिजे.करिअरची निवड करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे. गरज नसतांना कोणत्याही वस्तू घेऊ नये. तरुणाने शेतीकडे वळले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, आजच्या तरुणाईने समाज माध्यमांकडे जास्त वेळ न देता अभ्यासाकडे जर दिला तर नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल. असे अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश माने यांनी केले, वक्त्यांचा परिचय डॉ.विलास गावीत यांनी करून दिला, तर आभार प्रा. प्रतिभा पाटील यांनी मानले.
या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.किरण पाटील,प्रा.रोहन गायकवाड, करिअर कौन्सलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला मराठी विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
