भाषा व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन- डॉ.प्रदीप औजेकर

अमळनेर प्रतिनिधी, येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात ०९.०९.२०२४ ते १०.०९.२०२४ आणि १३.०९.२०२४ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ. प्रदीप औजेकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मराठी विषयात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नोकरीची वेगवेगळी क्षेत्र विद्यार्थ्यांना माहिती असायला हवीत. भाषेवर प्रभुत्व मिळविता यायला पाहिजे, तुमची भाषा चांगली असेल तर जगातील कोणत्याही भाषा तुम्ही अवगत करून संवाद साधू शकता. कधी ही भाषेचा न्यूनगंड बाळगता कामा नये. कोणतेही लेखन करतांना शुद्धलेखनाचे नियम माहिती असणे आवश्यक आहे, अनुवाद हा रोजगाराचा नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे,असे मत व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, जीवनाला कलाटणी देणारी भाषा असते. ही भाषाच मानवाला समृद्ध करते. वाचनातूनच भाषा अवगत होते,भाषा ही जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इतके वाचा की तुम्ही ज्ञानी व्हाल.भाषा हे संवाद,भावना,विचाराचे प्रकटीकरण असते,असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.

प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.प्रतिभा पाटील यांनी करून दिला. या प्रसंगी प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.किरण गावीत, डॉ.रमेश माने, प्रा.योगेश पाटील, डॉ.विलास गावित, प्रा.किरण पाटील, प्रा.प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते.या प्रसंगी ५७ विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश पाटील यांनी केले तर आभार डॉ.विलास गावित यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!