पत्रकारितेत खळबळ : ‘सचोटी’ न्यूजचा संपादक राजकुमार छाजेड याच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल; हद्दपारीच्या मागणीने वातावरण तापले

अमळनेर : पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांच्या फिर्यादीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचा संपादक राजकुमार छाजेड याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) विविध गंभीर कलमांन्वये अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पत्रकारिता व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जातिवाचक शिवीगाळ व खोट्या तक्रारीचा आरोप

अजय भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्रकारितेच्या कामावरून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. छाजेड याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर यापूर्वीही आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न छाजेड याने केल्याचा गंभीर दावा भामरे यांनी केला आहे. भामरे यांनी यापूर्वी या प्रकरणी जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रीतसर दाद मागितली होती. अखेर प्राथमिक पोलीस तपासानंतर या प्रकरणात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला.

गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी ॲक्ट), 1989 मधील कलम 3(1)(p), 3(1)(q), 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आता साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे तपास करत आहेत.

‘जातीय मानसिकतेला थारा नको’ — सुजाण नागरिकांमधून प्रतिक्रिया

पत्रकारितेच्या क्षेत्रात विचारसरणी किंवा बातम्यांवरून मतभेद असणे स्वाभाविक मानले जाते; मात्र अशा मतभेदांचे रूपांतर जातीय द्वेष, शिवीगाळ आणि धमक्यांमध्ये होणे अत्यंत चिंताजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा वापर वैयक्तिक शत्रुत्व किंवा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी होऊ नये, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून जोर धरत आहे.

महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी जोर धरू लागली

दरम्यान, राजकुमार छाजेड याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्रात विविध ठिकाणी फसवणुकीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. त्याच्या या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करून त्याला महाराष्ट्रातून तडीपार (हद्दपार) करण्यात यावे, अशी अधिकृत मागणी राज्य शासनाकडे करण्याच्या तयारीत काही सामाजिक संघटना असल्याचे समजते.

या संपूर्ण प्रकरणात नेमके तथ्य काय आहे हे पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निष्पन्न होईल; मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने अमळनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!