“आईच्या रक्ताला आणि वडिलांच्या घामाला विसरू नका”; वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने मांडळवासीय हेलावले

अमळनेर : “तुमच्या जन्मापासून तुम्हाला घडविण्यापर्यंत आईच्या रक्ताचे आणि वडिलांच्या घामाचे मोलाचे योगदान असते. आई-वडिलांशिवाय तुमच्या आयुष्याला शून्य अर्थ आहे, त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका,” असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी केले.

​   अंमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शिवशाही समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव छत्रपती चौकात “न समजलेला बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली, तर कु. पूर्वशी पाटील हिच्या हस्ते आरती करण्यात आली.

​प्रबोधन आणि भावनिक साद

      वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातून सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य केले. पळून जाणाऱ्या मुली आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणारी मुले, या विषयांवर त्यांनी सुरुवातीला विनोदी शैलीत संवाद साधत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, नंतर आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचे आणि त्यागाचे वास्तव मांडताना त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यांच्या धीरगंभीर आवाजातील मांडणीमुळे उपस्थित तरुण आणि पालकांचे डोळे पाणावले होते.

​परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती

    या व्याख्यानाला मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. सुनील चोरडिया, संजय पाटील, प्रभूदास पाटील, सीताराम कोळी, कलमाडीचे सरपंच सोनू झालसे यांसह परिसरातील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. तसेच मांडळसह कलमाडी, वावडे, तरवाडे, मुडी, हेंकळवाडी, तामसवाडी, मोहाडी, जवखेडा आणि कंचनपूर या गावांतील पालक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

     ​कौटुंबिक नातेसंबंध घट्ट करण्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!