अमळनेर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नेत्रदान जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी मार्गदर्शन केले, तर प्रा. डॉ.हेमंत पवार (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी सर्वांना या अभियानात सामिल होण्याचे आवाहन केले .एनसीसी प्रमुख डॉ.प्रमोद चौधरी, सिनेट सदस्य जेष्ठ प्रा.डॉ.धीरज वैष्णव आणि आय क्यू ए सी समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
एनएसएस स्वयंसेवकांनी प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, अमळनेर रेल्वे स्थानक, अमळनेर बस स्थानक आणि प्रताप महाविद्यालय परिसरात पथनाट्य सादर करून नागरिकांना नेत्रदानाचे सामाजिक व मानवीय महत्त्व पटवून दिले. या कलात्मक सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांवर सकारात्मक प्रभाव पडला.
या शिबिरात महाविद्यालयातील २० प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेत्रदानासाठी फॉर्म भरले, ज्यामुळे हा उपक्रम आणखी प्रेरणादायी ठरला. एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्यामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा मिळाली. हा समाजोपयोगी उपक्रम ‘ *दृष्टी दान – श्रेष्ठ दान*’ या विचाराची प्रचिती देणारा ठरला. मरणोत्तर नेत्रदान हा सामाजिक बांधिलकीचा सर्वोच्च आदर्श आहे, हे या अभियानातून प्रभावीपणे अधोरेखित झाले.
