महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा माणुसकीचा दिवाळी फराळ! गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंदाचा प्रकाश!

अमळनेर  : दिवाळीचा खरा आनंद हा केवळ स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याचा प्रत्यय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेरच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमातून आला. दिवाळी सणानिमित्त समाजातील गरीब, गरजू व वंचित कुटुंबांच्याही घरात सणाचा गोडवा पोहोचावा, या उदात्त हेतूने पत्रकार संघाच्या वतीने फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत पाचपावली चौक परिसरातील गरजू कुटुंबांसह चोपडा नाक्याजवळील वर्णेश्वर परिसरातील गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ व मिठाई देण्यात आली. सणाच्या आनंदात सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमामुळे लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय गाढे, जिल्हा संघटक प्रवीण बैसाणे, जिल्हा उपाध्यक्ष विजय संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्वादिष्ट फरसाणचे संचालक विजय पाटील आणि हजुरी रेस्टॉरंटचे युवा उद्योजक प्रेम सासनाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका सचिव नूरखान पठाण, उपाध्यक्ष हृदयनाथ मोरे,हितेंद्र बडगुजर, संघटक आत्माराम आहिरे, संदीप सैंदाणे, प्रकाश बोरसे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

      पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही पत्रकार संघाने या उपक्रमातून अधोरेखित केले. दिवाळीचा आनंद हा वाटण्यातच खरा असतो. आपल्या आनंदात गरजूंचा सहभाग वाढविला, तरच सणाचे खरे सार्थक होते, असा माणुसकीचा आणि सामाजिक एकतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!