अमळनेर : येथील शिवाजी हायस्कूल मधील पाच अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला असून, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतरही त्यांचे वेतन थकीत असल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे. तब्बल २४ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने या शिक्षकांवर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण, बँकेच्या कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी हायस्कूलमधील पाच शिक्षकांना शिक्षणधिकारी जळगांव यांनी अतिरिक्त ठरवून त्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मूळ आस्थापनेने या शिक्षकांना कार्यमुक्त केले. मात्र, ज्या शाळांमध्ये त्यांचे समायोजन होणे अपेक्षित होते, तेथे आवश्यक आदेश आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संबंधित शिक्षकांना समायोजित करून घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या शिक्षकांची सेवा आणि वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहिला.
या परिस्थिती विरोधात संबंधित शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने निर्णयात सदर शिक्षकांचा पगार नियमित करण्याचे आदेश दिले आहे.त्या आधारे नाशिक विभाग शिक्षण उप संचालक संजय कुमार राठोड यांनी दिनांक 15 /10/ 2025 रोजी शिवाजी हायस्कूल अमळनेर संस्थेच्या अध्यक्ष, सचिव यांना पत्र देऊन सदर शिक्षकांचा पगार मूळ आस्थापनेने संस्थेच्या उत्पन्नातून अदा करण्याचे तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पीडित शिक्षकांनी या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला आहे. संबंधित शिक्षकांचे वेतन अद्याप मिळाले नसताना मुख्याध्यापकांचे वेतन सुरूच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
२४ महिन्यांपासून वेतनाविना संसाराचा गाडा
दोन वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घराच्या कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अन्नधान्य, भाजीपाला आणि औषधोपचारां साठीही आर्थिक चणचण भासत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे मानसिक तणाव आणि असहायतेची भावना वाढत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणात उच्च न्यायालयाने सदर शिक्षकांचे वेतन नियमित करण्याचे आदेश देऊन ही वेतन देण्यास टाळा टाळ करणाऱ्या जळगांव जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चौहान यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित शिक्षकांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून थकीत वेतन अदा करावे, तसेच समायोजनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशीही त्यांची मागणी आहे.
मुख्याध्यापकांची भूमिका
श्री एम ए पाटील, मुख्याध्यापक यांनी करडी नजर न्यूज ला आपली बाजू मांडताना सांगितले की, सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबतच्या नाशिक विभाग शिक्षण उप संचालक संजय कुमार राठोड व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) जळगांव चे अधीक्षक यांनी केलेल्या आदेशात सदर अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अध्यक्ष/सचिव, शिवाजी हायस्कूल अमळनेर यांच्या उत्पन्नातून अदा करण्याचे आदेश दिले असल्याने वेतन देणे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. जर शिक्षणाधिकारी यांनी मला आदेश दिले तर मी त्यावर नक्कीच कारवाई करेल.
